राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान : एक अभ्यास
收藏资源简介:
भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संरचना जगातील इतर राष्ट्रांपेक्षा निराळी वैशिष्ठयपूर्ण विशेषत: या वरिल सर्व क्षेत्रात कमालीची विषमतायुक्त व्यवस्था अस्तित्वात आहे. एखादा राष्ट्राचा सर्वांगीण विकास हा त्या राष्ट्रातील प्रत्येक घटकाचा विकास समांतर होणे आवश्यक असते. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीचा विचार करता त्यांना या विषमतायुक्त व्यवस्थेचा अनुभव आपल्या जीवनात प्रकर्षाने जाणवला होता प्राथमिक शिक्षणापासून ते संपूर्ण जीवनभर त्यांना या विषमतेचे चटके भोगावे लागले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील सर्वांगीण व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या वर्गात झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व अडथळ्यावर मात करून स्वत:ला सिध्द केले आहे. प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे. असे ठाम मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे महापुरुष आहेत की, ज्यांना भारतातील इतर महापुरुषांसारखे साहाय्यभूत सहकार्य सकारात्मक वातावरण प्राप्त झाले नाही तरीही त्यांनी मानवी समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान, विद्या, आचार, विचार, चिंतन, शील, धैर्य, निष्ठा, चिकाटी, स्वाभिमान, लोकशाही, समता, बंधुत्व यात त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. “सामाजिक व आर्थिक न्याय, मानवता व माणसाची प्रतिष्ठा यावर लोकशाही अधिष्ठित असली पाहिजे व तिला नैतिक अधिकार असले पाहिजे” 1 अशी लोकशाही डॉ. बाबासाहेब यांना अभिप्रेत होती असे धनंजय किर म्हणतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही शासन व्यवस्थाच नाही तर भारताच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास, आधुनिकीकरण, शेती, उद्योग, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, नदया जोड प्रकल्प, धरणांची निर्मिती, कर्मचारी महिला यांच्या बाबतीत अनेक प्रकारे कार्य करून राष्ट्र उभारणीस हातभार लावला आहे. एखादया राष्ट्रास विकसित होण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण घटकांवर कार्य करणे आवश्यक असते याची त्यांना पूर्ण जाण होती.त्यांनी या संदर्भात अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख लिहिले आहेत. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रूपी, राज्य आणि अल्पसंख्यांक पाकिस्तान अश्या भारताची फाळणी, शुद्र पूर्वी कोण होते, जातिव्यवस्थेचा नाश, अनटचेबल बुध्दा अँड हिज धम्मा असे अनेक ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहेत. त्यातील अनेक ग्रंथातून राष्ट्रउभारणीस लागणाऱ्या अनेक बाबींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. महिला, मागास जाती, अस्पृश्य जाती यांना स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी असणाऱ्या हक्क व अधिकारांची गरज राष्ट्रउभारणीत किती महत्त्वाची आहे यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट , यातना सहन करून न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कसोटीने केल्याचे स्पष्ट होते.हिंन्दू कोड बील सारखे महिलांच्या हक्क व अधिकारांना कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद करणारे विधेयक डॉ. आंबेडकरांनी समोर मांडले होते. यात भारतीय स्त्रीयांची सामाजिक व कौटुंबिक गुलामगिरीतून मुक्त करण्याची त्यांच्या हक्क व अधिकारांच्या सनदीस कायम करण्याचे सूत्र आहे. भारतातील अर्धि लोकसंख्या असलेल्या महिलांचा वर्ग दुर्लक्षित आधारहिन लाचारीचे जीवन जगत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पर्यायाने देशाच्या अध्या लोकसंख्येचे मनुष्यबळ राष्ट्राच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा इमानदार प्रयत्न केला आहे. भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्य केली आहेत. त्यांच्या या कार्याचे थोडक्यात विवेचन खालील प्रमाणे आपण करणार आहोत.



